Marathi (Marāṭhī): Unlocked Literal Bible for रोमकरांस पत्र

Formatted for Translators

©2022 Wycliffe Associates
Released under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License.
Bible Text: The English Unlocked Literal Bible (ULB)
©2017 Wycliffe Associates
Available at https://bibleineverylanguage.org/translations
The English Unlocked Literal Bible is based on the unfoldingWord® Literal Text, CC BY-SA 4.0. The original work of the unfoldingWord® Literal Text is available at https://unfoldingword.bible/ult/.
The ULB is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License.
Notes: English ULB Translation Notes
©2017 Wycliffe Associates
Available at https://bibleineverylanguage.org/translations
The English ULB Translation Notes is based on the unfoldingWord translationNotes, under CC BY-SA 4.0. The original unfoldingWord work is available at https://unfoldingword.bible/utn.
The ULB Notes is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License.
To view a copy of the CC BY-SA 4.0 license visit http://creativecommons.org/licenses/by-sa/4.0/
Below is a human-readable summary of (and not a substitute for) the license.
You are free to:
The licensor cannot revoke these freedoms as long as you follow the license terms.
Under the following conditions:
Notices:
You do not have to comply with the license for elements of the material in the public domain or where your use is permitted by an applicable exception or limitation.
No warranties are given. The license may not give you all of the permissions necessary for your intended use. For example, other rights such as publicity, privacy, or moral rights may limit how you use the material.

रोमकरांस पत्र

1
अभिनंदन

1प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून;2देवाने सुवार्तेविषयी आपल्या संदेष्ट्यांद्वारे पवित्र शास्त्रलेखात अगोदरच अभिवचन दिले होते;3ती सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्मास आला.

4व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टी प्रमाणे मरण पावलेल्यातून पुन्हा उठण्याने तो सामर्थ्याने देवाचा पुत्र ठरवला गेला; तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे.5त्याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपण ही मिळाली आहेत, ह्यासाठी की सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाकरता विश्वासाचे आज्ञापालन केले जावे.

6त्यांपैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यास बोलावलेले आहात.
7रोममधील तुम्हा सर्वांस, देवाच्या प्रियांस, पवित्रजन होण्यास बोलावलेल्यांस देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती मिळत राहो.
रोम शहराला भेट देण्याचा पौलाचा बेत

8मी तुमच्यातल्या सर्वांसाठी प्रथम येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.9मी ज्याच्या पुत्राच्या सुवार्तेत माझ्या आत्म्याने ज्याची सेवा करीत आहे, तो देव माझा साक्षी आहे की, मी निरंतर माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो;10आणि अशी विनवणी करतो की, आता शेवटी शक्यतो देवाच्या इच्छेने तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा.
11कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हास काही आत्मिक कृपादान दयावे ह्यासाठी मी तुम्हास भेटण्यास उत्कंठित आहे;12म्हणजे आपल्या एकमेकांना तुमच्या व माझ्या, विश्वासाने, मला तुमच्याबरोबर उत्तेजन मिळावे.
13बंधूंनो, मला जसे इतर परराष्ट्रीयात फळ मिळाले, तसेच तुमच्यात काही फळ मिळावे म्हणून, मी तुमच्याकडे यावे असे पुष्कळदा योजले होते, पण आतापर्यंत अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही.14मी ग्रीक व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा देणेकरी आहे.15म्हणून मी माझ्याकडून रोममधील तुम्हासही सुवार्ता सांगण्यास उत्सुक आहे.
सुवार्तेचे स्वरूप

16कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही.17कारण तिच्या द्वारे देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते कारण असा शास्त्रलेख आहे की, “नीतिमान विश्वासाने जगेल.”
परराष्ट्रीयांची दुष्टाई

18वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.19कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने स्वतः त्यांना ते प्रकट केले आहे.

20कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही.21कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत. पण ते स्वतःच्या कल्पनांत विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले.
22स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बनले.23आणि अविनाशी देवाच्या गौरवाऐवजी त्यांनी नाशवंत मनुष्य, तसेच पक्षी आणि चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या स्वरूपाची प्रतिमा केली.

24म्हणून त्यांना आपल्या शरीराचा त्यांचा त्यांच्यातच दुरुपयोग करण्यास देवानेदेखील त्यांना त्यांच्या अंतःकरणातील वासनांद्वारे अमंगळपणाच्या स्वाधीन केले.25त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन.

26या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले;27आणि तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून ते आपल्या वासनांत एकमेकांविषयी कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांशी अयोग्य कर्म केले आणि त्यांनी आपल्या संभ्रमाचे योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगले.

28आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
29ते सर्व प्रकारच्या अनीतीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्ट भाव, ह्यांनी पूर्ण भरलेले; कानगोष्टी करणारे,30निंदक, देवद्वेष्टे, टवाळखोर, गर्विष्ठ, प्रौढी मिरवणारे, वाईट गोष्टी शोधून काढणारे, आई-वडीलांचा अवमान करणारे,31निर्बुद्ध, वचनभंग करणारे, दयाहीन व निर्दय झाले.
32आणि या गोष्टी करणारे मरणाच्या शिक्षेस पात्र आहेत हा देवाचा न्याय त्यांना कळत असून ते त्या करतात एवढेच केवळ नाही, पण अशा गोष्टी करणार्‍यांना ते संमतीही देतात.

2
यहूदीही दोषी आहेत

1तेव्हा दुसर्‍याला दोष लावणार्‍या अरे बंधू, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही; कारण तू ज्या गोष्टींत दुसर्‍याला दोष लावतोस त्यामध्ये तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोष लावणारा तूही त्याच गोष्टी करतोस.2पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्‍यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे.

3तर अशा गोष्टी करणार्‍यांना दोष लावणार्‍या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्‍या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय?4किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय?
5पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस.6तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल.7म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच;
8परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना भयानक क्रोध व भयानक कोप.9संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील.
10पण प्रत्येक चांगले करणार्‍या प्रथम यहूद्याला आणि मग ग्रीकास गौरव, शांती व सन्मान ही मिळतील.11कारण देवाजवळ पक्षपात नाही.12कारण, नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल.
13कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील.14कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा स्वभावतः नियमशास्त्रातील गोष्टी करतात तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते स्वतः स्वतःसाठी नियमशास्त्र होतात.
15आणि एकमेकांतील त्यांचे विचार जेव्हा एकमेकांवर आरोप करतात किंवा एकमेकांचे समर्थन करतात आणि त्यांचे विवेकही त्यांच्या जोडीला साक्ष देतात तेव्हा ते त्यांच्या हृदयावर लिहिलेल्या नियमशास्त्राचा परिणाम दाखवितात.16देव, माझ्या सुवार्तेप्रमाणे जेव्हा मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्यादिवशी हे दिसून येईल.

17आता जर तू स्वतःला यहूदी म्हणतोस, नियमशास्त्राचा आधार घेतोस आणि देवाचा अभिमान मिरवतोस;18तू त्याची इच्छा जाणतोस आणि चांगल्या गोष्टी पसंत करतोस, कारण तुला नियमशास्त्रातून शिक्षण मिळाले आहे;19आणि तुझी खातरी आहे की तूच अंधळ्यांचा वाटाड्या आहेस जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश,20अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बाळांचा गुरु आहेस; कारण तुझ्याजवळ नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे;
21तर मग जो तू दुसर्‍याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय?22व्यभिचार करू नये, असे जो तू सांगतोस तो तू व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तींचा विटाळ मानतोस तो तू देवळे लुटतोस काय?
23जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिरवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय?24कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे देवाच्या नावाची परराष्ट्रीयात तुझ्यामुळे निंदा होत आहे.
25कारण जर तू नियमशास्त्राचे आचरण केलेस तर सुंता खरोखर उपयोगी आहे; पण जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे.26म्हणून कोणी मनुष्य जर सुंता न झालेला असूनही, नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय?27आणि देहाने सुंता न झालेला कोणी जर नियमशास्त्राचे पालन करीत असेल, तर ज्या तुला शास्त्रलेख व सुंताविधी मिळाले असूनही तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझा तो न्याय करणार नाही काय?
28कारण बाहेरून यहूदी आहे तो यहूदी नाही किंवा बाहेरून देहात सुंता आहे ती खरोखर सुंता नाही.29कारण जो अंतरी यहूदी आहे तो यहूदी होय आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे, शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुंता आहे ती सुंता होय आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल.

3
आक्षेपांचे खंडन

1मग यहूदी असण्यात फायदा तो काय? किंवा सुंताविधीकडून काय लाभ?2सर्वबाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, त्यांच्यावर देवाची वचने सोपवली होती.

3पण काहींनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाचा विश्वासूपणा व्यर्थ करील काय?4कधीच नाही! देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस,
आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.’

5पण आमची अनीती जर देवाचे न्यायीपण स्थापित करते तर आम्ही काय म्हणावे? जो देव आमच्यावर आपला क्रोध आणतो तो अन्यायी आहे काय? (मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे.)6कधीच नाही! असे झाले तर, देव जगाचा न्याय कसा करील?
7कारण जर माझ्या लबाडीने देवाचा खरेपणा अधिक प्रकट होऊन त्याच्या गौरवास कारण झाले, तर माझाही पापी म्हणून न्याय का व्हावा?8आणि आपण चांगले घडावे म्हणून वाईट करू या असे का म्हणून नये? आम्ही असे सांगत असतो अशी आमची निंदा कित्येक लोक करत आहे, अशा लोकांची त्यांना यथान्याय शिक्षा आहे.
मनुष्यप्राणी पापी आहे; नीतिमान कोणीही नाही.

9मग काय? आपण यहूदी अधिक चांगले आहोत काय? मुळीच नाही, कारण सगळे यहूदी व ग्रीक पापाखाली आहेत, असा आधीच आम्ही त्यांच्यावर आरोप केला आहे.10शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही.
11ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही,
12ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत;
सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.
13त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे.
ते आपल्या जीभांनी कपट योजतात,
त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते.
14त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे;
15त्यांचे पाय रक्त पाडण्यास उतावळे आहेत.
16विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गात आहेत.
17शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही.
18त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.’
19आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.20कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते.
ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे नीतीमत्वाची प्राप्ती

21पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्त्व, आता, प्रकट झाले आहे.22पण हे देवाचे नीतिमत्त्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे कारण तेथे कसलाही फरक नाही.
23कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत;24देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात.
25त्याच्या रक्ताकडून विश्वासाद्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्यास पुढे ठेवले, कारण देवाच्या मागे झालेल्या पापांच्या क्षमेमुळे सहनशीलपणात आणि त्याने आपले नीतिमत्त्व प्रकट करावे;26त्याने या आताच्या काळात आपले नीतिमत्त्व प्रकट करावे, म्हणजे त्याने नीतिमान असावे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्यास नीतिमान ठरविणारा व्हावे.
27मग आपला अभिमान कुठे आहे? तो बाहेर ठेवला गेला. कोणत्या नियमामुळे? कर्मांच्या काय? नाही, पण विश्वासाच्या नियमामुळे.28म्हणून, नियमशास्त्राच्या कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो हे आपण पाहतो.
29किंवा देव केवळ यहूद्यांचा देव आहे काय? परराष्ट्रीयाचा नाही काय? हो, परराष्ट्रीयांचा ही आहे.30जर सुंता झालेल्यांस विश्वासाने आणि सुंता न झालेल्यांस विश्वासाद्वारे जो नीतिमान ठरवील तो तोच एक देव आहे,

31तर मग आपण विश्वासाद्वारे नियमशास्त्र व्यर्थ करतो काय? तसे न होवो. उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो.

4
अब्राहामाचे उदाहरण

1तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला दैहिक दृष्ट्या काय मिळाले असे आपण म्हणावे?2कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्यास अभिमान मिरवण्यास कारण होते; पण देवापुढे नाही.3कारण शास्त्रलेख काय म्हणतो? अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणले गेले.

4आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन कृपा म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते.5पण जो काही करीत नाही, पण जो धर्माचरण न करणार्‍यास नीतिमान ठरवतो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणला जातो,
6देव ज्याच्या बाजूकडे कर्मांशिवाय नीतिमत्त्व गणतो अशा मनुष्याचा आशीर्वाद दावीद देखील वर्णन करतो; तो असे म्हणतो की,
7‘ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांची पापे झाकली गेली आहेत ते धन्य होत.

8ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप गणीत नाही तो मनुष्य धन्य होय.’
9मग हा आशीर्वाद सुंता झालेल्यांकरता आहे की, सुंता न झालेल्यांकरताही आहे? कारण आपण असे मानतो की, विश्वास हा अब्राहामाकडे नीतिमत्त्व असा गणण्यात आला होता.10मग तो कसा गणला गेला? त्याची सुंता झाल्यानंतर किंवा सुंता होण्याअगोदर? सुंता झाल्यानंतर नाही, पण सुंता होण्याअगोदर.
11आणि, तो सुंता न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्यास मिळालेल्या नीतिमत्त्वाचा शिक्का म्हणून त्यास सुंता ही खूण मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात, ते सुंता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे; म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्त्व गणले जावे.12आणि जे सुंता झालेले आहेत ते केवळ सुंता झालेले आहेत एवढ्यावरून नाही, पण आपला पिता अब्राहाम हा सुंता न झालेला होता तेव्हा त्याच्यात असलेल्या त्याच्या विश्वासास अनुसरुन जे चालतात त्यांचाही त्याने पिता व्हावे.
13कारण तू जगाचा वारीस होशील, हे वचन अब्राहामाला किंवा त्याच्या संतानाला नियमशास्त्राच्याद्वारे नव्हते, पण विश्वासाच्या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते.14कारण नियमशास्त्रामुळे जे आहेत ते वारीस झाले तर विश्वास निरर्थक आणि वचन निरुपयोगी केले गेले.15कारण नियमशास्त्र क्रोधाला कारण होते. पण जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघन नाही.
16आणि म्हणून हे वचन विश्वासाद्वारे म्हणजे कृपेने दिलेले आहे; ते ह्यासाठी की, नियमशास्त्रामुळे जे आहेत त्यांनाच ते असावे असे नाही. पण अब्राहामाच्या विश्वासामुळे जे आहेत त्यांनाही, म्हणजे सर्व संतानाला ते खात्रीने असावे. तो आपल्या सर्वांचा पिता आहे.17(कारण असे लिहिले आहे की, ‘मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.’) ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मरण पावलेल्यांना जिवंत करतो आणि अस्तित्वात नसलेल्यांना ते असल्याप्रमाणे बोलावतो त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे.
18‘तसे तुझे संतान होईल’ या वचनाप्रमाणे त्याने अनेक राष्ट्रांचा पिता व्हावे अशी आशा नसता, त्याने आशेने विश्वास ठेवला.19आणि विश्वासात दुर्बळ नसल्यामुळे, तो सुमारे शंभर वर्षांचा असता त्याने आपल्या निर्जीव शरीराकडे व सारेच्या उदराच्या वांझपणाकडे लक्ष दिले नाही.
20त्याने देवाच्या वचनाविषयी अविश्वासाने संशय धरला नाही; तो विश्वासात स्थिर असल्यामुळे देवाला गौरव देत होता.21आणि त्याची पूर्ण खात्री झाली की, देव आपले अभिवचन पूर्ण करण्यासही तो समर्थ आहे.22आणि म्हणून ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणले गेले.
23आता ते त्याच्या हिशोबी गणले गेले, हे केवळ त्याच्याकरता लिहिले गेले नाही.24पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ज्याने मरण पावलेल्यातून उठवले त्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर तो ते आपल्याही हिशोबी गणले जाणार आहे.25तो प्रभू येशू आपल्या अपराधांसाठी धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो जिवंत करण्यात आला आहे.

5
विश्वासाचा परिणाम

1आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे.2आपण उभे आहोत त्या कृपेतही त्याच्याद्वारे विश्वासाने आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो.

3आणि इतकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते,4आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते.5आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाची प्रीती ओतली जात आहे.
ख्रिस्ताच्या मृत्युने प्रकट झालेली देवाची प्रीती

6कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मरण पावला.7कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील,
8पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो.9मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ.
10कारण आपण वैरी होतो, तेव्हा जर आपला देवाबरोबर, त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की, आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ.11इतकेच नाही, पण आता ज्याच्या द्वारे आपण समेट स्वीकारला आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान मिरवतो.
आदामाकडून मृत्यु, ख्रिस्ताकडून जीवन

12म्हणून एका मनुष्याद्वारे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यांवर मरण आले.13करण नियमशास्त्रापुर्वी जगात पाप होते, पण नियमशास्त्र नसतेवेळी पाप हिशोबात येत नाही.
14तरी मरणाने आदामापासून मोशेपर्यंत राज्य केले; आदामाच्या उल्लंघनाच्या रूपाप्रमाणे ज्यांनी पाप केले नव्हते त्यांच्यावरही राज्य केले आणि तो तर जो पुढे येणार होता त्याचा नमुना होता.15पण अपराधाची गोष्ट आहे तशी कृपादानाची नाही; कारण एकाच्या अपराधामुळे जर पुष्कळ मरण पावले, तर त्याहून अधिक हे आहे की, देवाची कृपा व येशू ख्रिस्त या एका मनुष्याच्या कृपेची देणगी पुष्कळांसाठी विपुल झाली.
16आणि पाप करणार्‍या एकामुळे जसा परिणाम झाला, तशी देणगीची गोष्ट नाही; कारण एका अपराधामुळे दंडाज्ञेसाठी न्याय आला, पण अनेक अपराधांमुळे निर्दोषीकरणासाठी कृपादान आले.17कारण मरणाने, एका अपराधामुळे, एकाच्या द्वारे राज्य केले, तर त्याहून अधिक हे आहे की, जे कृपेची व नीतिमत्त्वाच्या देणगीची विपुलता स्वीकारतात, ते त्या एकाच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील.
18म्हणून जसे एकाच अपराधामुळे सर्व मनुष्यांना दंडाज्ञा ठरविण्यास कारण झाले, तसे एकाच निर्दोषीकरणामुळे सर्व मनुष्यांना जीवनासाठी नीतिमान ठरविण्यास कारण झाले.19कारण जसे एकाच्या आज्ञाभंगामुळे अनेक जण पापी ठरवले गेले, तसे एकाच्या आज्ञापालनामुळे अनेक जण नीतिमान ठरवले जातील.
20शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली.21म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे प्राप्त होणार्‍या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे राज्य चालवावे.

6
ख्रिस्ताशी एक असणे व पाप करत राहणे हे परस्परविरोधी आहे

1तर आता आपण काय म्हणावे? कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापात रहावे काय?2कधीच नाही! आपण जे पापाला मरण पावलो आहोत ते त्यामध्ये ह्यापुढे कसे राहणार?3किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्या आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय?

4म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते ह्यासाठी की जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मरण पावलेल्यांमधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे.5कारण जर त्याच्या मरणाच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले आहोत तर त्याच्या पुन्हा उठण्याच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले होऊ.
6आपण जाणतो की आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये.7कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे.
8पण आपण जर ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असलो, तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपण विश्वास ठेवतो.9कारण आपण हे जाणतो की, मरण पावलेल्यांमधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता अजिबात राहिली नाही.
10कारण तो मरण पावला तो पापासाठी एकदाच मरण पावला, पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे.11तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला माना.

12म्हणून तुम्ही आपल्या मरणाधीन शरीरात त्याच्या वासनांच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका.13आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मरण पावलेल्यातून जीवंत झालेले असे देवाला समर्पण करा आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्त्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा.14तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, पण कृपेखाली आणले गेला आहात.
गुलामगिरीवरुन केलेला बोध

15मग काय? मग आपण नियमशास्त्राखाली नसून कृपेखाली आणले गेलो आहोत, म्हणून आपण पाप करावे काय? कधीच नाही.16तुम्ही ज्याला आपल्या स्वतःला दास म्हणून आज्ञा पाळण्यास समर्पण करता, तुम्ही ज्याच्या आज्ञा पाळता त्याचे तुम्ही दास आहात. ते मरणासाठी पापाचे किंवा नीतिमत्त्वासाठी आज्ञापालनाचे, हे तुम्ही जाणत नाही काय?
17पण देवाला धन्यवाद कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या,

18आणि पापापासून मुक्त केले जाऊन नीतिमत्त्वाचे दास झाला.
19मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्त्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा.20कारण तुम्ही पापाचे दास होता, तेव्हा तुम्ही नीतिमत्त्वाच्या बाबतीत स्वतंत्र होता.21आता तुम्हास ज्यांची लाज वाटते त्या गोष्टींपासून तेव्हा तुम्हास काय फळ मिळत होते? कारण त्या गोष्टींचा शेवट मरण आहे.
22पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हास पवित्रीकरण हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन आहे.23कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे.

7
विवाहावरून केलेले बोध

1बंधूंनो, (नियमशास्त्राची माहीती असणार्‍यांशी मी बोलत आहे) मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यावर नियमशास्त्राची सत्ता आहे हे तुम्ही जाणत नाही काय?

2कारण ज्या स्त्रीला पती आहे, ती पती जिवंत आहे तोपर्यंत त्यास नियमशास्त्राने बांधलेली असते; पण तिचा पती मरण पावला, तर पतीच्या नियमातून ती मुक्त होते.3म्हणून पती जिवंत असताना, जर ती दुसर्‍या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी हे नाव मिळेल. पण तिचा पती मरण पावला तर ती त्या नियमातून मुक्त होते. मग ती दुसर्‍या पुरुषाची झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.
4आणि म्हणून, माझ्या बंधूंनो, तुम्हीपण ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मरण पावलेले झाला आहात; म्हणजे तुम्ही दुसर्‍याचे, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला त्याचे व्हावे; म्हणजे आपण देवाला फळ द्यावे.5कारण आपण देहाधीन असताना नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात, मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या.
6पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्यास आपण मरण पावलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, ते ह्यासाठी की, आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही.
नियमशास्त्र व पाप

7मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? कधीच नाही. पण मला नियमशास्त्राशिवाय पाप समजले नसते कारण ‘लोभ धरू नको’ असे नियमशास्त्राने सांगितल्याशिवाय मला लोभ कळला नसता.8पण पापाने आज्ञेची संधी घेऊन माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला कारण नियमशास्त्राशिवाय पाप निर्जीव होते.
9कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मरण पावलो.10आणि जीवनासाठी दिलेली आज्ञा मरणाला कारण झाली, हे मला दिसले.
11पण पापाने आज्ञेची संधी घेतली आणि मला फसवले व तिच्या योगे ठार मारले.12म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे.
13मग जी चांगली आहे ती मला मरण झाली काय? तसे न होवो. पण जी चांगली आहे, तिच्या योगे, पाप हे पाप असे प्रकट व्हावे, म्हणून माझ्यात, ती मरण हा परिणाम घडविते; म्हणजे पाप हे आज्ञेमुळे पराकोटीचे पापिष्ट झाले.
मनुष्याच्या दैहिक व आध्यात्मिक भावनांचा लढा

14कारण आपण हे जाणतो की, नियमशास्त्र हे आत्मिक आहे, पण मी दैहिक आहे; पापाला विकलेला आहे.
15कारण मी काय करीत आहे ते मला कळत नाही; कारण मी ज्याची इच्छा करतो ते मी करीत नाही पण मी ज्याचा द्वेष करतो ते मी करतो.16मग मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे हे मी कबूल करतो.
17मग आता मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते.18कारण मी जाणतो की, माझ्यात (म्हणजे माझ्या देहात) काहीच चांगले वसत नाही कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे, पण चांगले करीत राहणे नाही.
19कारण मी जे चांगले करण्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याची इच्छा करीत नाही ते वाईट मी करतो.20मग आता मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते.21मग मी चांगले करू इच्छीत असता वाईट माझ्याजवळ हाताशी असते, हा नियम आढळतो.
22कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो;23पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो; तो माझ्या मनातील नियमाशी लढून, मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.
24मी किती कष्टी मनुष्य! मला या मरणाच्या शरीरात कोण सोडवील?25मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.

8
पवित्र आत्म्याप्रमाणे चालणे

1म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.2कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या पवित्र आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले.

3कारण देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्यास जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापासाठी पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.4म्हणजे आपण जे देहाला अनुसरून नाही पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत त्या आपल्यात नियमशास्त्राची आज्ञा पूर्ण व्हावी.5कारण देहाला अनुसरून चालणारे दैहिक गोष्टींवर मन ठेवतात; पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टींवर मन ठेवतात.
6देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती.7कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही.8म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत.
9पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो, तर तुम्ही देहाचे नाही, पण आत्म्याचे आहात कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही.10पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे, तर शरीर पापामुळे मरण पावलेले आहे, पण नीतिमत्त्वामुळे आत्मा जीवन आहे.
11पण ज्याने येशूला मरण पावलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मरण पावलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणार्‍या, आपल्या आत्म्याच्याद्वारे तुमचीही मरणाधीन शरीरे जिवंत करील.

12म्हणून बंधूंनो आपण देणेकरी आहोत; पण देहानुसार जगण्यास देहाचे नाही13कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल.
देवाचे पुत्र

14कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहेत.15कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे ‘अब्बा-पित्या’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे.
16तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची लेकरे आहोत.17आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहोत. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण दुख तर सोसले वारीस आहोत.
प्रकट होणारे वैभव

18कारण मी मानतो की, या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत.19कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे.
20कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वेच्छेने नाही, पण ज्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राहिली;21कारण सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्त केली जाऊन देवाच्या मुलांच्या गौरवी स्वातंत्र्यात आणली जाईल.22कारण आपण जाणतो की, सर्व सृष्टी आतापर्यंत कण्हत व यातना सोशीत आहे.
23आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही, स्वतः दत्तक घेतले जाण्याची, म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता, अंतर्यामी कण्हत आहोत.24कारण, आपण आशेने तारले गेलो आहो; पण दिसणारी आशाही आशा नाही, कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का?25पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली, तर आपण धीराने प्रतीक्षा करतो.
पवित्र आत्म्याचे साहाय्य

26त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात पवित्र आत्माही आपल्याला सहाय्य करतो, कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही. पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कण्हण्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो.27आणि, जो अंतःकरणे शोधून पाहतो तो पवित्र आत्म्याचे मन जाणतो, कारण तो पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेस येईल अशी मध्यस्थी करतो.
28कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात.29कारण त्यास ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे.30आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले.
ख्रिस्ताची व देवाची प्रीती

31मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण?32आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही, पण आपल्या सर्वांसाठी त्यास दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टीही का देणार नाही?
33देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे.34दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मरण पावला, हो, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे.
35ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तरवार करील काय?36कारण असे लिहिले आहे की,
‘तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत,
आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’

37पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.38कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्‍या गोष्टी किंवा बले,39किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.

9
इस्राएली लोकांच्या अविश्वासाबद्दल पौलाचे दुःख

1मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही आणि माझा विवेक पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे2की, मला मोठे दुःख होत आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत राहणारी यातना आहे.

3कारण दैहिक दृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवांकरता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छीन.4ते इस्राएली आहेत; त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव, करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत.5पूर्वज त्यांचे आहेत; त्यांच्यापासून दैहिक दृष्ट्या ख्रिस्त आला; तो सर्वांवर असलेला देव युगानुयुग धन्यवादित असो; आमेन.
देवाने दिलेली वचने व्यर्थ झाली नाहीत

6पण देवाचे वचन, जणू व्यर्थ झाले असे नाही; कारण जे इस्राएलातले आहेत ते सर्वच इस्राएली नाहीत,7आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून सर्व मुले आहेत असे नाही; तर ‘इसहाकालाच तुझे संतान म्हणले जाईल’ असे वचन आहे;
8म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत.9कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’
10आणि इतकेच नाही; पण ज्या एकापासून, म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून रिबेका गरोदर असतेवेळी,11आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्‍याच्या इच्छेप्रमाणे,12तिला सांगण्यात आले होते की, ‘मोठा धाकट्याची सेवा करील.’13कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘याकोबावर मी प्रीती केली पण एसावाचा द्वेष केला.’
देव अन्यायी नाही

14मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनीती आहे काय? तसे न होवो.15कारण तो मोशेला म्हणतो, ‘मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करीन आणि मी ज्याच्यावर उपकार करतो त्याच्यावर उपकार करीन.’16तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही किंवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे.
17म्हणून शास्त्रलेख फारोला म्हणतो, ‘मी तुला ह्यासाठी मोठे केले की, तुझ्याद्वारे मी माझे सामर्थ्य प्रकट करावे आणि सर्व पृथ्वीवर माझे नाव गाजविले जावे.’18म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याची इच्छा असेल त्यास तो कठिण करतो.
देव सर्वाधिपती आहे

19तू ह्यावर म्हणशील की, तो तरीही दोष का लावतो? त्याच्या योजनेला कोणी विरोध केला आहे?20पण उलट अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्‍याला म्हणू शकेल?21कुंभाराने एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय?
22मग आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे जरी देव इच्छीत असला, तरी त्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागविले,23आणि गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?24त्याने ज्यांना केवळ यहूद्यांमधून नाही, पण परराष्ट्रीयामधूनही बोलावले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत.
25कारण तो होशेयाच्या ग्रंथात असेही म्हणतो की,
‘जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन,
आणि जी माझी आवडती नव्हती, तिला मी माझी आवडती म्हणेन.
26आणि असे होईल की त्यांना ज्याठिकाणी, तुम्ही माझी प्रजा नाही, असे म्हणले होते,
तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणले जाईल.’

27यशयादेखील इस्राएलाविषयी ओरडून म्हणतो की, ‘इस्राएलाच्या पुत्रांची संख्या जरी समुद्राच्या वाळूसारखी झाली, तरी एक अवशेष वाचवला जाईल.28कारण सर्व संपवून थांबविल्याप्रमाणे प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करील.’29आणि यशयाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे,
सैन्यांच्या प्रभूने जर आपल्यासाठी बीज ठेवले नसते तर
आम्ही सदोमासारखे असतो आणि गमोरासारखे झालो असतो.
नीतिमत्त्व प्राप्त न होण्याचे कारण

30मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्त्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्त्व मिळविले आहे.31पण जे इस्राएल नीतिमत्त्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाहीत.
32आणि का? कारण ते विश्वासाने नाही, पण कृतींनी त्याच्यामागे लागले कारण ते अडखळणाच्या दगडावर अडखळले.33कारण असे लिहिले आहे की,
‘बघा, मी सियोनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो.
आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’

10
इस्रालाएलाविषयी पौलाची मनीषा

1बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरिता देवाजवळ विनंती आहे.2कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही.3कारण ते देवाच्या नीतिमत्त्वाविषयी अज्ञानी असता आणि स्वतःचे नीतिमत्त्व प्रस्थापित करू पाहत असता ते देवाच्या नीतिमत्त्वाला वश झाले नाहीत.

नीतिमत्त्वाचा नवा मार्ग सर्वांसाठी आहे

4कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्त्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे.5कारण नियमशास्त्राने प्राप्त होणार्‍या नीतिमत्त्वाविषयी मोशे लिहितो की, ‘जो मनुष्य ते आचरतो तो त्याद्वारे जगेल.’
6पण विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे म्हणते की, तू आपल्या मनात म्हणू नकोस की, स्वर्गात कोण चढेल? (म्हणजे ख्रिस्ताला खाली आणण्यास)7किंवा मृतलोकात कोण उतरेल? (म्हणजे ख्रिस्ताला मरण पावलेल्यांमधून वर आणण्यास)
8पण ते काय म्हणते?
ते वचन तुझ्याजवळ,
ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे.
म्हणजे आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे.

9कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.10कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.
11म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’12यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे,13‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’
14मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्‍याशिवाय ते कसे ऐकतील?15आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’

16पण सर्वांनीच सुवार्तेचे आज्ञापालन केले नाही, कारण यशया म्हणतो की, ‘प्रभू, आमच्याकडून ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे?’17तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
18पण मी म्हणतो की त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खचित ऐकले;
‘सर्व पृथ्वीवर त्यांचा आवाज आणि
जगाच्या टोकापर्यंत त्यांचे शब्द पोहोचले आहेत.’

19पण मी म्हणतो की, इस्राएलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो,
‘जे राष्ट्र नाहीत त्यांच्याकडून.
मी तुम्हास ईर्ष्येस चढवीन, एका निर्बुद्ध राष्ट्राकडून मी तुम्हास चेतवीन.’

20पण यशया फार धीट होऊन म्हणतो की,
‘ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो आहे,
ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही त्यांना प्राप्त झालो आहे.’

21पण इस्राएलाविषयी तो म्हणतो, ‘मी एका, अवमान करणार्‍या आणि उलटून बोलणार्‍या प्रजेपुढे दिवसभर माझे हात पसरले.’

11
देवाने इस्राएली लोकांचा सर्वस्वी त्याग केला नाही

1तर मी म्हणतो की, देवाने आपल्या लोकांस नाकारले आहे काय? कधीच नाही कारण मीही इस्राएली आहे, अब्राहामाच्या संतानातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे.2देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने नाकारले नाही. शास्त्रलेख एलियाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय? तो देवाजवळ इस्राएलाविरुद्ध अशी विनंती करतो की,3‘प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना मारले आहे आणि तुझ्या वेद्या खणून पाडल्या आहेत; आणि मी एकटा राहिलो आहे आणि ते माझ्या जीवावर टपले आहेत.’

4पण देवाचे उत्तर त्यास काय मिळाले? ‘ज्यांनी बआलाच्या मूर्तीपुढे गुडघा टेकला नाही, असे एकंदर सात हजार लोक मी माझ्यासाठी राखले आहेत.’5मग त्याचप्रमाणे या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे.
6आणि जर कृपेने आहे, तर कृतीवरून नाही; तसे असेल तर कृपा ही कृपा होत नाही.7मग काय? इस्राएल जे मिळवू पाहत आहे ते त्यास मिळाले नाही, पण निवडलेल्यांना ते मिळाले आणि बाकी अंधळे केले गेले.8कारण नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देवाने त्यांना या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे; त्यांनी पाहू नये असे डोळे आणि त्यांनी ऐकू नये असे कान दिले आहेत.’

9त्याचप्रमाणे दावीद म्हणतो की,
‘त्यांचे मेज हे त्यांच्यासाठी जाळे व सापळा,
आणि अडथळा व प्रतिफळ होवो.
10त्यांनी पाहू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत,
आणि तू त्यांची पाठ सतत वाकव.’

11मग मी विचारतो की, इस्राएलाने पडावे म्हणून त्यांना अडखळण आहे काय? तसे न होवो. पण त्यांच्या पडण्यामुळे त्यांना ईर्ष्येस चढवण्यास तारण परराष्ट्रीयांकडे आले आहे.12आता, त्यांचा अपराध हे जर जगाचे धन झाले आणि त्यांचे कमी होणे हे जर परराष्ट्रीयांची धन झाले, तर त्यांचा भरणा होणे हे त्याहून किती अधिक होईल?
परराष्ट्रीयांचे तारण; कलम लावण्याचे उदाहरण

13पण, तुम्ही जे परराष्ट्रीय आहात, त्या तुमच्याशी मी बोलत आहे. ज्याअर्थी, मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्याअर्थी, मी माझ्या सेवेचे गौरव करतो.14यहूदी म्हणजे माझ्या देहाचे आहेत त्यांना मी शक्य त्याद्वारे ईर्ष्येस चढवून त्यांच्यामधील काहींचे तारण करावे.
15कारण त्यांचा त्याग म्हणजे जगाशी समेट आहे तर त्यांचा स्वीकार म्हणजे मृतांतून जीवन नाही काय?16कारण पहिला उंडा जर पवित्र आहे तर तसाच सगळा गोळा आहे आणि मूळ जर पवित्र आहे तर तसेच फाटे आहेत.
17आणि जैतुनाचे काही फाटे जर तोडले गेले आणि तू रानटी जैतून असता, त्यामध्ये कलम करून जोडला गेलास आणि तू त्या जैतुनाच्या पौष्टीकतेच्या मुळात जर सहभागी झालास18तर त्या फाट्यांविरुद्ध अभिमान मिरवू नकोस आणि जरी अभिमान मिरवलास तरी तू मुळाला उचलले नसून मुळाने तुला उचलले आहे.
19मग तू म्हणशील की, मला कलम करून जोडण्यासाठी ते फाटे तोडले गेले.20बरे, ते अविश्वासामुळे तोडले गेले आणि तू विश्वासामुळे स्थिर आहेस, ह्यात मोठेपणा मानू नकोस. पण भीती बाळग;21कारण, जर देवाने मूळच्या फाट्यांची गय केली नाही तर तो तुझीही गय करणार नाही.
22तर तू देवाची दया आणि छाटणी बघ. जे पडले त्यांच्यावर छाटणी, पण, तू जर दयेत राहिलास तर तुझ्यावर दया; नाही तर, तूही छाटला जाशील.
23आणि ते जर अविश्वासात राहिले नाहीत तर तेही कलम करून जोडले जातील; कारण देव त्यांना पुन्हा कलम करून जोडण्यास समर्थ आहे.24कारण तुला मूळच्या रानटी जैतुनांतून कापून, जर निसर्गाविरुद्ध, चांगल्या जैतुनाला कलम करून जोडले आहे, तर जे नैसर्गिक फाटे आहेत ते, किती विशेषेकरून, आपल्या मूळच्या जैतुनाला कलम करून जोडले जातील?
सर्वांवर ममता करणे हाच देवाचा अंतिम हेतू

25बंधूंनो, तुम्ही स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नये, म्हणून माझी इच्छा नाही की, तुम्ही या रहस्याविषयी अज्ञानी असावे. ते असे की, परजनांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएलात काही अंशी अंधळेपण उद्धवले आहे.

26आणि सर्व इस्राएल अशाप्रकारे तारले जाईल कारण असे लिहिले आहे की,
‘सियोनापासून उद्धारक येईल,
आणि याकोबातून अभक्ती घालवील.
27आणि मी त्यांची पापे दूर करीन.
तेव्हा माझा त्यांच्याबरोबर हा करार होईल.’

28ते सुवार्तेच्या बाबतीत तुमच्यामुळे वैरी आहेत पण ते दैवी निवडीच्या बाबतीत पूर्वजांमुळे प्रिय आहेत.29कारण देवाची कृपादाने व पाचारण अपरिवर्तनीय असतात.
30कारण ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता पण आता इज्राएलाच्या आज्ञाभंगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे.31त्याचप्रमाणे आता तेही अवमान करीत आहेत; म्हणजे तुमच्यावरील दयेच्या द्वारे त्यांच्यावर दया केली जावी.32कारण देवाने सर्वांवर दया करावी म्हणून सर्वांना आज्ञाभंगात एकत्र कोंडले आहे.

33अहाहा! देवाच्या सुज्ञतेच्या व ज्ञानाच्या धनाची खोली किती? त्याचे न्याय किती अतर्क्य आहेत? आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहेत?
34असे नियमशास्त्रात लिहिले आहे; ‘कारण प्रभूचे मन कोणी ओळखले आहे?
किंवा त्याचा सल्लागार कोण होता?
35किंवा कोणी त्यास आधी दिले आणि ते त्यास परत दिले जाईल?’

36कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून, त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी आहेत; त्यास युगानुयुग गौरव असो. आमेन.

12
नविन जिवितक्रम

1म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.2आणि या जगाशी समरूप होऊ नका पण तुमच्या मनाच्या नविनिकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.

आध्यात्मिक दानांचा योग्य उपयोग

3कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे, मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की, त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे.
4कारण आपल्याला एका शरीरात जसे पुष्कळ अवयव आहेत आणि सर्व अवयवांचे काम एक नाही,5तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तात एक शरीर आहोत; आणि आपण एकमेकांचे अवयव आहोत.
6पण आपल्याला पुरविलेल्या कृपेप्रमाणे आपल्याला वेगवेगळी कृपादाने आहेत; जर ते परमेश्वराचा संदेश देणे असेल तर विश्वासाच्या परिमाणानुसार आपण संदेश द्यावेत;7सेवा असेल, तर सेवा करण्यात तत्पर रहावे; जो शिक्षण देतो त्याने शिक्षण देण्यात,8किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर रहावे; जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे; जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा, जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी.
ख्रिस्ती जीवितक्रमाचे नियम

9प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर रहा, चांगल्याला बिलगून रहा.10बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे,
11कामात आळशी न होत, आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे व्हा.12आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे,13पवित्रजनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा.
14जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वाद द्या, शाप देऊ नका.15आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि रडणार्‍यांबरोबर रडा.16एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका.
17वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा.18शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा.
19प्रियांनो, तुम्ही स्वतः सूड घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या कारण असे लिहिले आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे परमेश्वर म्हणतो.’
20पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे;
तो तान्हेला असेल तर त्यास प्यायला दे;
कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील.

21वाईटाने जिंकला जाऊ नकोस; पण बऱ्याने वाईटाला जिंक.

13
अधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळण्याविषयी सूचना

1प्रत्येक मनुष्याने आपल्यावर असलेल्या अधिकाराऱ्यांच्या अधीन रहावे, कारण देवाकडून नाही असा अधिकारी नाही; आणि जे आहेत ते देवाकडून नेमलेले आहेत.2म्हणून जो अधिकाऱ्याला विरोध करतो तो देवाच्या योजनेला विरोध करतो आणि जे प्रतिकार करतील ते स्वतःवर दोष आणवतील.

3कारण चांगल्या कामात अधिकार्‍यांची भीती नाही पण वाईट कामात असते; मग तुला अधीकाराऱ्यांची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर आणि तुला त्यांच्याकडून प्रशंसा मिळेल.4कारण तुझ्या चांगल्यासाठी तो देवाचा सेवक आहे; पण तू जर वाईट करीत असलास तर भय धर, कारण तो विनाकारण तरवार धरीत नाही कारण तो वाईट करणार्‍यांवर क्रोध व्यक्त करण्यास सूड घेणारा देवाचा सेवक आहे.5म्हणून तुम्ही केवळ क्रोधासाठी नाही, पण तसेच विवेकासाठी अधीन राहणे अगत्य आहे.
6या कारणास्तव तुम्ही करही देता कारण याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत.7म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान.
बंधुप्रेम

8तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, ह्याशिवाय कोणाचे देणेकरी असू नका कारण जो दुसर्‍यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे.9कारण ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको’ आणि अशी दुसरी कोणतीही आज्ञा असेल तर ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर’ या एका वचनात ती समावलेली आहे.10प्रीती आपल्या शेजार्‍याचे काही वाईट करीत नाही; म्हणून प्रीती ही नियमशास्त्राची परिपूर्ती आहे.
ख्रिस्तदिनाचे आगमन

11आणि हे आताच समय ओळखून करा, कारण आताच तुमची झोपेतून उठण्याची घटका आली आहे कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आपले तारण अधिक जवळ आले आहे.12रात्र सरत आली असून दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधारातली कामे टाकून प्रकाशातली शस्त्रसामग्री परिधान करू या.
13दिवसा शोभेल असे चालू या. दंगलीत व धुंदीत किंवा अमंगळपणात व कामातुरपणात किंवा कलहात व ईर्ष्येत राहू नये.14तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त परिधान करा आणि देहवासनांसाठी काही तरतुद करू नका.

14
विश्वासात दुर्बळ असलेल्यांशी सहिष्णुता

1जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.2कोणी असा विश्वास ठेवतो की, आपण सर्वकाही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाजीपाला खातो.

3जो खातो त्याने न खाणार्‍यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्‍यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.4दुसर्‍याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्यास स्थिर करण्यास समर्थ आहे.
5आणि कोणी एखादा दिवस दुसर्‍या दिवसाहून अधिक मानतो; दुसरा कोणी सगळे दिवस सारखे मानतो. प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनात पूर्ण खातरी होऊ द्यावी.6जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे आणि जो खातो तोसुध्दा प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो; त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही आणि देवाचे उपकार मानतो.
7कारण आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही.8कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत.9कारण ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
10मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.11कारण असे लिहिले आहे की,
‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील,
आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’

12तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल.13तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये.
14मी जाणतो व प्रभू येशूमुळे मी मानतो की, कोणतीही गोष्ट मूळची अशुद्ध नाही, पण जो कोणी कोणतीही गोष्ट अशुद्ध मानतो त्यास ती अशुद्ध आहे.15पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता प्रीतीस अनुसरून चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस.
16म्हणून तुम्ही जे चांगले स्वीकारले आहे त्याची निंदा होऊ देऊ नका.17कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.
18कारण जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला स्वीकार्य व मनुष्यांनी स्वीकृत केलेला होतो.19तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्यामागे लागू या.
20अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस; सर्व गोष्टी खरोखर खाण्यायोग्य आहेत; पण जो मनुष्य दुसर्‍याला अडखळण करून खातो त्यास ते वाईट आहे.21मांस न खाणे किंवा द्राक्षारस न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अडखळण होते असे काहीही न करणे चांगले आहे.
22तुझ्यात विश्वास आहे, तो तू देवासमोर आपल्याजवळ बाळग. जो स्वतः पसंत केलेल्या गोष्टींत स्वतःला दोषी ठरवीत नाही तो धन्य होय.23पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो; कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे.

15
सशक्त व अशक्त

1म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वाहावा आणि स्वतःला संतुष्ट करू नये.2आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजार्‍याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे.

3कारण ख्रिस्तानेही स्वतःला संतुष्ट केले नाही, पण ‘तुझी निंदा करणार्‍यांची सर्व निंदा माझ्यावर आली’ हे नियमशास्त्रात लिहिले आहे तसे होऊ दिले.4कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणार्‍या उत्तेजनाने आशा धरावी.
5आता, जो धीर व उत्तेजन देतो तो देव तुम्हास असे देवो की तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे एकमेकांशी एकमनाचे व्हावे;6म्हणजे, जो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे त्याचे तुम्ही एकमनाने व एकमुखाने गौरव करावे.
परराष्ट्रीय

7म्हणून देवाच्या गौरवाकरता जसा ख्रिस्तानेही आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा.
8कारण मी म्हणतो की, ख्रिस्त देवाच्या सत्याकरता सुंता झालेल्यांचा सेवक झाला; म्हणजे पूर्वजांना दिलेल्या त्याच्या वचनांचे त्याने त्यांना प्रमाण द्यावे,9आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे की,
‘म्हणून मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन,
आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.’
10आणि पुन्हा तो म्हणतो की,
‘अहो परराष्ट्रांनो, त्याच्या प्रजेबरोबर आनंद करा.’
11आणि पुन्हा ‘सर्व परराष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याची स्तुती करोत.’

12आणि पुन्हा, यशया म्हणतो की,
‘इशायाला अंकुर फुटेल,
आणि जो परराष्ट्रीयांवर अधिकार करण्यास उभा राहील;
त्याच्यावर परराष्ट्रे आशा ठेवतील.’

13आणि आता आशेचा देव तुम्हास तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.
पौलाने प्रशस्तपणे लिहीण्याचे कारण

14आणि माझ्या बंधूंनो, तुमच्याविषयी मीही स्वतः मानतो की, तुम्ही स्वतः सदिच्छेने पूर्ण, सर्व प्रकारच्या ज्ञानाने भरलेले व एकमेकांस बोध करण्यास समर्थही आहात.
15पण मी तुम्हास आठवण द्यावी म्हणून, तुम्हास काही ठिकाणी, अधिक धैर्याने लिहिले आहे; कारण मला देवाने पुरविलेल्या कृपेमुळे मी तुम्हास लिहिले आहे.16ती कृपा ह्यासाठी आहे की, तिच्या योगे, मी परराष्ट्रीयांसाठी देवाच्या सुवार्तेचे याजकपण करणारा, येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे; म्हणजे परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे.
17म्हणून मला देवाविषयीच्या गोष्टींत, ख्रिस्त येशूच्या द्वारे अभिमानाला कारण आहे.18कारण परराष्ट्रीयांना आज्ञांकित करावे म्हणून, ख्रिस्ताने माझ्याकडून घडवले नाही असे शब्दाने आणि कृतीने काही सांगायला मी धजणार नाही.19चिन्हांच्या व अद्भूतांच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने; अशाप्रकारे मी यरुशलेम शहरापासून सभोवताली इल्लूरिकम प्रांतापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली आहे.
20पण दुसर्‍याच्या पायावर बांधणारा होऊ नये म्हणून ख्रिस्ताचे नाव जेथे घेतले जात नव्हते, अशा ठिकाणी मी सुवार्ता सांगण्यास झटलो.21म्हणजे, शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे,
‘ज्यांना त्याच्याविषयी सांगण्यात आले नव्हते ते लोक पाहतील,
आणि ज्यांनी ऐकले नव्हते त्यांना समजेल.’
पौलाचे पुढील बेत

22आणि म्हणून, तुमच्याकडे येण्यामध्ये मला पुष्कळ अडथळा आला.23पण आता या भागात काही वाव न राहिल्यामुळे व तुमच्याकडे यावे अशी इतक्या पुष्कळ वर्षांपासून माझी उत्कंठा असल्यामुळे,
24मी स्पेन देशाकडे प्रवास करीन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी अशी आशा करतो की, मी तिकडे जाताना तुम्हास भेटेन आणि तुमच्यात आधी, थोडा तृप्त झाल्यावर तुम्ही तिकडे पोहचते करावे.25पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता यरुशलेम शहरास जात आहे.
26कारण मासेदोनियाला व अखयाला हे बरे वाटले की, यरुशलेम शहरात रहात असलेल्या पवित्र जनांत जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी.27हे खरोखर त्यांना बरे वाटले आणि ते त्यांचे ऋणी आहेत; कारण त्यांच्या आत्मिक गोष्टींत जर परराष्ट्रीय भागीदार झाले आहेत, तर दैहिक गोष्टींत त्यांची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
28म्हणून मी हे पुरे केल्यावर हे पीक त्यांना शिक्का करून देऊन, तुमच्या बाजूकडून स्पेनला जाईन.29आणि माझी खातरी आहे की, मी तुमच्याकडे येईन तेव्हा मी ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा भार घेऊन येईन.
प्रार्थना करण्याची विनंती

30पण, मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकरिता व आत्म्याच्या प्रीती करिता, बंधूंनो, तुम्हास विनंती करतो की, माझ्या लढ्यात, तुम्ही माझ्याकरिता देवाला प्रार्थना करण्यात माझे साथीदार व्हा;31म्हणजे, यहूदीयात जे अवमान करणारे लोक आहेत त्यांच्या हातून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमसाठी जी माझी सेवा आहे ती तेथील पवित्र जनांस मान्य व्हावी;32म्हणजे देवाच्या इच्छेने मी आनंदाने तुमच्याकडे यावे व तुमच्या सहवासात पुन्हा उत्तेजित व्हावे.
33आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

16
पौलाचा मित्रमंडळीला सलाम

1आता, किंख्रिया शहरातील असलेल्या मंडळीची सेविका, आपली बहीण फिबी हिची मी तुम्हास शिफारस करतो की,2तुम्ही पवित्र जनांस शोभेल असे तिचे प्रभूमध्ये स्वागत करा आणि तिच्या ज्या कामात तुमची गरज लागेल त्यामध्ये तिचे साहाय्यक व्हा; कारण ती स्वतः पुष्कळांना व मलाही साहाय्यक झाली आहे.

3ख्रिस्त येशूमध्ये माझे जोडीदार-कामकरी प्रिस्का व अक्विला ह्यांना सलाम द्या.4यांनी माझ्या जिवासाठी आपला जीव धोक्यात घातला आणि मीच एकटा त्यांचे उपकार मानतो असे नाही, पण परराष्ट्रीयातील सर्व मंडळ्या त्यांचे उपकार मानतात.5त्याचप्रमाणे, त्यांच्या घरात जमणार्‍या मंडळीलाही सलाम द्या आणि माझ्या प्रिय अपैनतला सलाम द्या; तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथमफळ आहे.
6मरीयेला सलाम द्या; तिने तुमच्यासाठी पुष्कळ कष्ट केले आहेत;

7माझे आप्त व जोडीदार-बंदिवान अंद्रोनिकस व युनिया ह्यांना सलाम द्या; प्रेषितांत त्यांचे नाव आहे व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्ताचे झाले होते.8प्रभूमध्ये माझा प्रिय अंप्लियात ह्याला सलाम द्या.
9ख्रिस्तात आमचा जोडीदार-कामकरी उर्बान आणि माझा प्रिय स्ताखू ह्यांना सलाम द्या.

10ख्रिस्तात स्वीकृत अपिल्लेस ह्याला सलाम द्या. अरिस्तबूलच्या घरातल्यांना सलाम द्या.11माझा आप्त हेरोदियोन ह्याला सलाम द्या. नार्कीसच्या घरचे जे प्रभूत आहेत त्यांना सलाम द्या.

12प्रभूमध्ये श्रम करणार्‍या त्रुफैना व त्रुफोसा ह्यांना सलाम द्या. प्रिय पर्सिस हिला सलाम द्या. प्रभूमध्ये तिने पुष्कळ श्रम केले आहेत.13प्रभूमध्ये निवडलेला रुफस व त्याची आई ह्यांनाही सलाम द्या. ती मला आई समान आहे.14असुंक्रित, फ्लगोन, हरमेस, पत्रबास आणि हरमास ह्यांना व त्यांच्याबरोबर राहणार्‍या बांधवांना सलाम द्या.
15फिललोगस, युलिया, निरीयस व त्याची बहीण आणि ओलुंपास ह्यांना सलाम द्या आणि त्यांच्याबरोबर राहणार्‍या सर्व पवित्र जनांस सलाम द्या.16पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हास सलाम पाठवत आहेत.
फुटी करणाऱ्यांसंबंधी इशारा

17आता, बंधूंनो, मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा.18कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या मनुष्यांची मने बहकवतात;
19कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कळले आहे म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाईटाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा आहे.20आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
निरनिराळ्या जणांचा सलाम

21माझा जोडीदार-कामकरी तीमथ्य आणि माझे आप्त लुकियस, यासोन व सोसिपेतर हे तुम्हास सलाम पाठवतात.22हे पत्र ज्याने लिहिले आहे तो तर्तियस तुम्हास प्रभूमध्ये सलाम पाठवत आहे.
23माझा आणि या सर्व मंडळीचा आश्रयदाता गायस तुम्हास सलाम पाठवत आहे. नगर कारभारी एरास्त व बंधू कुर्त हेही तुम्हास सलाम पाठवतात.24-25आता माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे जे रहस्य मागील युगात गुप्त ठेवण्यात आले,26पण आता प्रकट करण्यात आले आहे व संदेष्ट्यांच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हास स्थिर करण्यास समर्थ आहे,27त्या अनन्य ज्ञानी देवाला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.